अमळनेर नगरपरिषद निवडणूक २०२५ : शहरात ६० टक्के मतदान; निवडणूक प्रक्रिया शांततेत पार – काही ठिकाणी ईव्हीएममध्ये किरकोळ बिघाड..

0
New-Doc-12-03-2025-08.33.jpg


आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ शांततेत पार पडली असून शहरात एकूण ६० टक्के मतदानाची नोंद झाली. नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवार तर ३४ नगरसेवक पदांसाठी तब्बल १२६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. दरम्यान, प्रभाग क्रमांक १ (अ) मधील मतदान २१ डिसेंबरला होणार असल्याने त्या प्रभागातील राजकीय हालचाली स्वतंत्रपणे सुरू आहेत.

शहरभर उत्साहाची लाट : महिलांनी व युवकांनी घेतला पुढाकार

सकाळपासूनच प्रभाग १३, प्रभाग १८, उर्दू शाळा, झामी चौक, शाह आलम नगर परिसरात मतदारांच्या रांगा दिसत होत्या. पहाटेपासूनच महिलांचा लक्षणीय सहभाग तरुण मतदारांचा उत्साह यामुळे मतदान केंद्रांत चैतन्याचे वातावरण होते.

तथापि काही सुशिक्षित वस्त्या व कॉलनी भागांत सुरुवातीला अपेक्षित प्रतिसाद न दिसल्याने मतदानाचा वेग मंदावल्याचे चित्र होते.


काही केंद्रांवर मतदानाची संथ गती

प्रभाग ८ मधील केंद्र क्रमांक ४१ वर मतदान संथ गतीने सुरू असल्याचे निरीक्षणात आले. ताडेपुरा, गांधलीपुरा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन परिसरात दुपारी मतदान शांततेत होत असताना सायंकाळी मात्र मतदारांचा वाढता ओढा दिसला.

सायंकाळी सहा वाजता ताडेपुरा केंद्र क्रमांक १५ वर तब्बल २०० हून अधिक मतदारांची रांग लागली होती. त्यामुळे नियोजित वेळेच्या पुढे सव्वा आठपर्यंत मतदान चालू राहिले.

तीन मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड – अल्पावधीत सुटले तांत्रिक प्रश्न

शहरातील एकूण ९७ मतदान केंद्रांपैकी तीन केंद्रांवरील ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची नोंद झाली. प्रभावित केंद्रे पुढीलप्रमाणे — साईबाबा स्कूल – केंद्र ७२ उर्दू स्कूल न ६– केंद्र ६७ संत सखाराम महाराज स्कूल – केंद्र ४१सूचना मिळताच निवडणूक निर्णय अधिकारी निवृत्ती गायकवाड, सहाय्यक अधिकारी रुपेशकुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पथक तात्काळ दाखल झाले आणि बिघाडग्रस्त यंत्रणा बदलत काही मिनिटांत मतदान सुरळीत करण्यात आले.

५८२ कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा निवडणुकीत कार्यरत. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी नगरपरिषदेतर्फे ५८२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष सहाय्यक अधिकारी शिपाई पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता वृद्ध, दिव्यांग व दुर्बल मतदारांसाठी सर्व केंद्रांवर व्हीलचेअरची विशेष सोय करण्यात आली होती.

प्रदत्त मतदानाची प्रकरणे — योग्य नियमांनुसार कारवाई

काही केंद्रांवर एका मतदाराच्या नावाने आधीच मतदान झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. अशा प्रकरणांमध्ये नियमांनुसार प्रदत्त मतदानाची प्रक्रिया राबवण्यात आली आणि संबंधित मतदारांना स्वतंत्र मतपत्रिका देऊन मतदानाचा हक्क बजावू देण्यात आला.

प्रभाग १३ मध्ये शांततेत मतदान; प्रतिस्पर्धी उमेदवारांची जबाबदार भूमिका प्रभाग १३ मध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांनी परस्पर समझदारी दाखवत निवडणुकीचे वातावरण शांत राखले. कोणताही वाद, तणाव किंवा गोंधळ न होता मतदान शांततेत पूर्ण केले
पोलीस आणि प्रशासनाचा चोख बंदोबस्त
निवडणूक प्रक्रिया सुरळीत व निर्विघ्न पार पडावी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या बंदोबस्ताचे नेतृत्व डीवायएसपी विनायक कोते
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम
पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड
शरद काकळीज, भगवान शिरसाठ, सिद्धांत शिसोदे, गणेश पाटील, प्रशांत पाटील, नितीन कापडणे, विनोद संदानशिव
अधिकाऱ्यांनी दिवसभर पथकांसह गस्त घालत शांतता राखली. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी निवृत्ती गायकवाड, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनीही दिवसभर मतदान केंद्रांना भेट देत परिस्थितीचे निरीक्षण केले.
मतमोजणीवर सर्वांचे लक्ष
आता सर्वांचे लक्ष मतमोजणी प्रक्रियेवर लागले असून शहरातील राजकीय गणितावर परिणाम करणारे निर्णायक निकाल काही दिवसांत जाहीर होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed