अमळनेर – साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळाची मासिक सभा उत्साहात पार पडली; हभप साईनाथ राठोड यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन..

0
New-Doc-12-02-2025-08.44.jpg

आबिद शेख/ अमळनेर

पूज्य साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळाची मासिक सभा ३० नोव्हेंबर रोजी रामबाग येथील संस्थेच्या कार्यालयात उत्साहात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील होते, तर प्रमुख वक्ते म्हणून हभप साईनाथ मांगो राठोड उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन प्रमुख पाहुणे तसेच कार्यकारी मंडळाच्या हस्ते करण्यात आली. या महिन्यात ज्येष्ठ सभासदांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. त्यांना श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

मुख्य वक्ते श्री. साईनाथ राठोड यांनी संत कबीर महाराज यांच्या दोह्यांवर आधारित अप्रतिम असे निरूपण केले —
“कबीरा येह जग निर्धना, धनवंत नहीं कोई;
धनवंत तेहू जानिये, जा के राम नाम धन होई.”

त्यांच्या विचारप्रवर्तक भाषणाने उपस्थितांना अध्यात्मिक ऊर्जेची नवचैतन्याची अनुभूती दिली.

यानंतर नवनिर्वाचित कार्यकारिणीचा परिचय गंभीर चौधरी यांनी करून दिला. जेष्ठांना मौलिक मार्गदर्शन करताना श्री. मनोहर काशिनाथ राऊत यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंडळाचे सचिव शिवाजीराव मोहन पाटील यांनी तर प्रार्थना श्रावण पाटील यांनी केली.

या महिन्यात उमाकांत चंद्रकांत नाईक यांनी वाढदिवसाच्या प्रित्यर्थ सर्व सभासदांना नाश्ता देऊन आनंद वाटला. पुढील काळात ज्यांचा वाढदिवस असेल त्यांनी सामायिक नाश्त्याची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय सभेत एकमताने घेण्यात आला.

दरम्यान, अमळनेर नगरपरिषद निवडणुकीचे वातावरण तापत असताना अनेक मान्यवरांनी या सभेस भेट देत ज्येष्ठांचा आशीर्वाद व सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

शेवटी उपस्थितांचे आभार सचिव एस. एम. पाटील यांनी मानले आणि अध्यक्षांच्या परवानगीने सभेची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed