मंगरूळमध्ये संविधान स्वीकृती दिन उत्साहात; महिलांसोबत ‘गप्पा-टप्पा’ उपक्रमातून जागरूकतेचा संदेश..
आबिद शेख/ अमळनेर
साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने संविधान स्वीकृती दिन मंगरूळ येथे उत्साहात साजरा करण्यात आला. संविधानातील समानता, स्वातंत्र्य आणि न्याय यांच्या मूल्यांची जनजागृती करण्यासाठी गावातील महिलांसोबत ‘छोटासा गप्पा-टप्पा’ कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमात “आपले संविधान स्त्रियांना स्वतंत्र व्यक्ती म्हणून मान्यता देते, त्यांचे मत महत्त्वाचे मानते” असा संदेश देत महिलांच्या हक्कांबद्दल माहितीपूर्ण चर्चा झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना मतदानाचा अधिकार मिळवून देण्यासाठी केलेल्या संघर्षाची माहिती देताना वक्त्यांनी सांगितले की, एकेकाळी काहीजण महिलांना “अक्कल नसते” असे सांगून मतदानाचा अधिकार नाकारण्याचा प्रयत्न करत होते. परंतु बाबासाहेबांनी ठाम भूमिका घेत महिलांना देशाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले.
महिलांच्या मतांची दखल घेत संविधानानेच लाडकी बहीण योजना, मुलींचे मोफत शिक्षण योजना अशा अनेक योजना वास्तवात आल्या असल्याचेही उपस्थितांना सांगण्यात आले.
घरातही अनेकदा महिलांच्या मतांना किंमत दिली जात नाही, मात्र संविधानाने महिलांना देशाचे समान मालक बनवले असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन सुनंदा पाटील तसेच साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या सचिव दर्शना पवार यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
संविधानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत उपस्थितांनी देशाच्या प्रगतीसाठी संविधानाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली.
