तालुका मन्सूरी पिंजारी समाजाचा अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीला जाहीर पाठिंबा..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर तालुका मन्सूरी पिंजारी समाजाने आगामी नगरपरिषद निवडणुकीत अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. लेखी समर्थनपत्र देत समाजाने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांच्यासह सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना साथ देण्याची घोषणा केली.

मन्सूरी पिंजारी बिरादरीने व्यक्त केलेल्या भूमिकेनुसार, अमळनेर शहरात विकासकामे मोठ्या प्रमाणात व्हावीत, सामाजिक एकता, शांतता आणि सामंजस्य टिकून राहावे, तसेच स्वच्छ, सुरक्षित आणि समृद्ध शहर म्हणून अमळनेरची ओळख निर्माण व्हावी, या हेतूने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकास आघाडी सातत्याने काम करीत असल्याचा विश्वासही समाजाने व्यक्त केला.
यावेळी आमदार अनिल पाटील आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत मन्सूरी पिंजारी समाजाचे प्रतिनिधींनी लेखी समर्थनपत्र सुपूर्त केले. या कार्यक्रमात समाजाचे तालुकाध्यक्ष सलीम महम्मद पिंजारी, मन्वर जुम्मा पिंजारी, अशपाक पिंजारी, इस्माईल पिंजारी, कासम पिंजारी, हाजी इकबाल पिंजारी, वसीम पिंजारी यांच्यासह पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.
समाजाच्या विविध मागण्यांचे पत्रही यावेळी आमदार अनिल पाटील यांना देण्यात आले. निवडणूक पार पडताच त्या मागण्यांची पूर्तता करण्यात येईल, असे आश्वासन आमदार पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.
