अमळनेर ग्रामीण भागात मजुरांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांचे हाल; आधुनिक यंत्रणेकडे वळण्याची वेळ टोकन यंत्रणेचा वापर..

0
New-Doc-11-26-2025-11.08.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसमोर मजूरटंचाईचं मोठं संकट उभं राहिलं आहे. शेती मशागतीपासून ते पेरणीपर्यंत सर्वच कामांसाठी मजूर उपलब्ध न झाल्याने शेतकऱ्यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावं लागत आहे. सध्याच्या हंगामात पेरणीचा मुहूर्त असूनही मजूर न मिळाल्याने अनेकांची शेती अडगळीची पडली आहे.

निवडणुकीच्या वातावरणामुळे तरुण व महिलांचा मोठा वर्ग प्रचारात गुंतला असल्याने शेतमजुरांची संख्या अधिकच कमी झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अक्षरशः हवालदिल झाला आहे. मजूर न मिळाल्याने शेतीचे काम पुढे ढकलावे लागत असून उत्पादन खर्चातही मोठी वाढ होत आहे.

दरम्यान, अनेक शेतकरी पेरणीसाठी नवीन ‘टोकन यंत्रणे’चा अवलंब करत आहेत. उपलब्ध मजूर व यंत्रसामग्रीनुसार क्रमांक देऊन पेरणी केली जात असून या प्रक्रियेमुळे मोठी कसरत करावी लागत आहे. मजुरांच्या अनुपस्थितीत शेतकऱ्यांना दुप्पट मेहनत घेऊन काम करावे लागत आहे.

यात भर म्हणजे निसर्गाचीही साथ मिळत नसल्याने समस्यांत आणखी वाढ झाली आहे. अनियमित पाऊस, तापमानातील बदल आणि हवामानातील अनिश्चिततेमुळे पेरणीला योग्य वेळ साधणे अवघड जात आहे.

सध्याच्या परिस्थितीत कृषीतंत्रज्ञान आणि आधुनिक यांत्रिकीकरण ही काळाची गरज असल्याचे मत कृषी तज्ञांनी व्यक्त केले आहे. मजूरटंचाईचा प्रश्न कायम राहणार असल्याने शेतकऱ्यांनी आधुनिक मशागत साधनांचा वापर, ड्रोन टेक्नॉलॉजी, स्वयंचलित पेरणी यंत्रे, तसेच शेतीतील नवकल्पनांचा अवलंब करणे अत्यावश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे.

शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत असताना शासनानेही या समस्येकडे लक्ष देऊन आवश्यक ती मदत व सुविधा पुरवण्याची मागणी ग्रामीण भागातून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed