शिरपूरच्या तरुणाला १० किलो गांज्यासह अटक — अमळनेर डीवायएसपी पथकाची धडक कारवाई..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर — अमळनेर शहरात गांजा विक्रीसाठी मोटारसायकलवरून येणाऱ्या शिरपूर तालुक्यातील एका तरुणाला डीवायएसपी विनायक कोते यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून १० किलो ५९० ग्रॅम गांजा (किंमत ₹२,१०,०००) तसेच ₹८०,००० किमतीची मोटारसायकल असा एकूण ₹२,९०,२०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली आहे.कारवाईची सविस्तर माहिती
डीवायएसपी कोते यांना १७ नोव्हेंबर रोजी बिनखात्री माहिती मिळाली की नंदगाव रस्त्यावरून अमळनेरकडे एक व्यक्ती मोटारसायकल (एमएच १८ सीडी ७३२६) वर गांजा घेऊन येत आहे. त्यानुसार त्यांनी एपीआय रवींद्र पिंगळे, गणेश पाटील, उज्वल पाटील, शेखर साळुंखे, नितीन मनोरे, समाधान सोनवणे यांचे पथक तयार केले.
पथकाने तांबेपुरा शिवार, बोरी नदी पुलाजवळ मंदिर परिसरात वाहने पार्क करून नंदगाव रस्त्यावर सापळा लावला. दुपारी ३:३५ वाजता संशयित क्रमांकाची मोटारसायकल दिसताच त्याला अडवण्यात आले.
तपासणीदरम्यान गोणीत ओलसर बिया व बोंडेसह १० किलो ५९० ग्रॅम गांजा आढळला. संबंधित तरुणाने आपले नाव —
भोजु सुरेश पवार (वय ३४, रा. बभळाज, ता. शिरपूर) असे सांगितले.
फॉरेन्सिक पथकासमोर पंचनामा करून गांजा व मोटारसायकल असा एकूण ₹२,९०,२०० किमतीचा माल जप्त करण्यात आला.
आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ मधील
कलम ८, २०, २२ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

