धुळ्याच्या गुन्हेगारी वर्तुळात खळबळ; देवपूरातील दहशत निर्माण करणारी टोळी जिल्ह्यातून तडीपार..
24 प्राईम न्यूज 12 Nov 2025

धुळे शहरातील देवपूर परिसरात दहशत माजवणाऱ्या सराईत पाच गुन्हेगारांना सहा महिन्यांसाठी संपूर्ण धुळे जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे. या टोळीने परिसरात दहशत निर्माण केली होती. त्यांच्याविरुद्ध विविध गंभीर गुन्हे दाखल असून, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत चिवरे यांनी ही माहिती दिली आहे.
प्रामुख्याने देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत असलेल्या या टोळीचा प्रमुख राजेश मैकुलाल चित्ते (वय ५१) असून, त्याच्यासह रामेश्वर मैकुलाल चित्ते (वय ४९), गोविंद मैकुलाल चित्ते (वय ४०), साहिल राजेश चित्ते (वय २०) आणि तरुणकुमार रामेश्वर चित्ते (वय २१) अशी या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. हे सर्वजण विष्णुनगर, देवपूर येथील रहिवासी आहेत.
या टोळीविरुद्ध जखमी करणे, शिवीगाळ करणे, धमक्या देणे, वाद निर्माण करणे अशा गंभीर प्रकारचे गुन्हे नोंदवले गेले होते. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरात शांततेचा भंग होऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर देवपूर पोलीस ठाण्याने या टोळीविरुद्ध बाह्य बंदी आदेश (कलम ५५) अंतर्गत प्रस्ताव सादर केला. सखोल तपासानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सुनावणी घेत या पाचही गुन्हेगारांना सहा महिन्यांसाठी धुळे जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार करण्याचे आदेश दिले.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत चिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार उपाध्याय, पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय पाटील आणि पोलिस अंमलदार सतीष हिरे यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली.

