खान्देश साहित्य संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी कवी शरद धनगर, जिल्हा सचिवपदी पत्रकार उमेश काटे यांची नियुक्ती..
आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर :खान्देश साहित्य संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रसिद्ध गझलकार व कवी शरद धनगर तर जिल्हा सचिवपदी ज्येष्ठ पत्रकार उमेश काटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघाचे केंद्रिय अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सुर्यवंशी यांनी या दोघांची नियुक्ती पुढील तीन वर्षांसाठी जाहीर केली.
जेष्ठ साहित्यिक डॉ. फुला बागुल, अहिराणी साहित्यिक सुभाष अहिरे, जेष्ठ साहित्यिक डॉ. सयाजी पगार, कवी कैलास भामरे, केंद्रीय कार्यकारणी सदस्य रत्नाताई पाटील आणि प्रा. रमेश राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रिय सचिव रमेश बोरसे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रक देण्यात आले.
कवी शरद धनगर यांनी यापूर्वी सोनी मराठीवरील ‘कोण होणार करोडपती?’ या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. तसेच नवी दिल्लीतील साहित्य अकादमी आयोजित ‘साहित्योत्सव’ राष्ट्रीय साहित्य संमेलन, उस्मानाबाद येथील ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’, बेळगाव येथील ‘मराठी भाषा साहित्य संमेलन’ अशा अनेक प्रतिष्ठित संमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभाग नोंदविला आहे. तसेच अमळनेर येथे झालेल्या ‘पहिल्या अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनाच्या’ आयोजनात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
तर उमेश काटे हे गेल्या २५ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असून त्यांनी विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक विषयांवर लेखन केले आहे. सध्या ते ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ (मसाप) अमळनेर शाखेचे कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अमळनेर येथे झालेल्या ९७ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन तसेच धुळे येथील अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन या दोन्ही ठिकाणी सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली आहे.
या दोघांच्या कार्याची दखल घेत संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांनी त्यांच्यावर जिल्हास्तरीय जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या निवडीबद्दल मराठी वाङ्मय मंडळ, पू. साने गुरुजी मोफत वाचनालय व ग्रंथालय, शिवशाही फाउंडेशन, साने गुरुजी शैक्षणिक विचार मंच, तसेच ‘मसाप’ अमळनेर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

