अमळनेर तालुक्यात वाळू माफियांचा उच्छाद; काँग्रेसकडून तातडीने लिलाव प्रक्रिया सुरू करण्याची मागणी..
आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर — अमळनेर तालुक्यातील नद्यांमधून बेकायदेशीर वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू असून, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने वाळू माफियांचा उच्छाद वाढला आहे. तालुक्यात मांडळ, सावखेडा, जडोद, बोहरा, रुंदाटी, मुंगसे अशा तब्बल 15 ठिकाणी वाळू उपसा क्षेत्रे आहेत. मात्र शासनाकडून अद्याप गौण खनिज (वाळू) लिलाव प्रक्रिया झालेली नाही.

लिलाव न झाल्याने कायदेशीर मार्गाने वाळू उपलब्ध नसतानाही, तालुकाभर लहानमोठी बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे नद्यांमधून अवैधपणे वाळू उपसा करून मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. बांधकाम करणाऱ्यांना काळ्या बाजारातील वाळूसाठी जास्तीचे दर मोजावे लागत असून, सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट सुरू आहे.
रात्री उशिरापर्यंत ट्रॅक्टरच्या आवाजाने नागरिक त्रस्त झाले आहेत. वाळू माफिया तरुणांना पैशांचे आमिष दाखवून चोरीच्या कामात ओढत असून, त्यामुळे व्यसनाधीनतेसारख्या सामाजिक समस्या निर्माण होत आहेत.
या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भागवत केशव सूर्यवंशी व जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे यांनी दि. 11 नोव्हेंबर 2025 रोजी प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांना निवेदन देऊन, तातडीने गौण खनिज लिलाव प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच, बेकायदेशीर वाळू उपसा थांबवण्यासाठी प्रभावी पावले न उचलल्यास काँग्रेसकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही पत्रात देण्यात आला आहे.

