आमदार अनिल पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्तेपदी नियुक्ती — उत्तर महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण..

0
New-Doc-11-11-2025-06.53.jpg


आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर :महाराष्ट्र राज्याचे माजी मदत व पुनर्वसन तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री, नंदुरबार जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनिल पाटील यांच्या शांत, संयमी आणि विकासाभिमुख नेतृत्वामुळे पक्षाच्या संघटनात्मक बळकटीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.

आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत आमदार पाटील यांनी ग्रामीण विकास, शेती, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा आणि रोजगार निर्मिती या क्षेत्रात भरीव काम केले आहे. नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना राबवल्या, तर मंत्रीपदाच्या काळात आपत्तीग्रस्तांच्या पुनर्वसनात आदर्श कार्यप्रणाली उभी केली.

पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या या कार्यकुशलतेची दखल घेत राज्यस्तरीय जबाबदारी सोपवली असून, सामाजिक माध्यमांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अमळनेर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतून शुभेच्छांचा ओघ सुरू असून, स्थानिक कार्यकर्त्यांनी ही नियुक्ती अमळनेरचा आणि उत्तर महाराष्ट्राचा सन्मान असल्याचे म्हटले आहे.

अनिल भाईदास पाटील यांचे प्रतिक्रिया वक्तव्य:
“आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाला अधिक बळकटी देण्यासाठी नवीन प्रवक्त्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत.
प्रवक्ता म्हणून जबाबदारी दिल्याबद्दल मी पक्षश्रेष्ठींचा मनःपूर्वक आभारी आहे. पक्षाच्या धोरणांचा प्रसार, जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडणे आणि अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यास मी सदैव कटिबद्ध आहे. माझ्यासोबत निवड झालेल्या सर्व सहकाऱ्यांचेही मनःपूर्वक अभिनंदन!”

आमदार अनिल पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed