अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : 97 केंद्रांवर 89 हजार 751 मतदार सज्ज..
आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर :अमळनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी एकूण 18 प्रभागांतील 36 जागा आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी 97 मतदान केंद्रांवर 89 हजार 751 मतदार मतदान करणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा आणि मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पालिकेच्या सभागृहात आयोजित बैठकीत सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते. यंदाच्या निवडणुकीत मागील निवडणुकीपेक्षा एक मतदान केंद्राने वाढ झाली आहे. आचारसंहिता कक्ष प्रमुख म्हणून गटविकास अधिकारी एन.आर. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
एकूण मतदारांपैकी 45,928 पुरुष, 48,821 महिला आणि 2 इतर मतदार अशी आकडेवारी देण्यात आली. दुबार मतदारांविषयी विचारणा झाल्यावर मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी सांगितले की, पालिका कर्मचारी तपासणी करत असून परिशिष्ट अ भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मतदानाच्या दिवशी ज्या मतदारांचा शोध लागणार नाही त्यांच्याकडूनही परिशिष्ट भरून घेतले जाईल.
उमेदवारांच्या सोयीसाठी नगरपालिकेत ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्यात आली असून सात टेबलांवर परवानग्या आणि प्रभागनिहाय कामकाज पार पडणार आहे. प्रत्येक टेबलावर तीन प्रभागांचे काम हाताळले जाईल, तर नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र टेबल ठेवण्यात आले आहे.
मतमोजणी मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच ३ डिसेंबर रोजी होणार आहे. उमेदवारांनी आपल्या मतमोजणी प्रतिनिधींच्या नियुक्तीसाठी तीन दिवस आधी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन तहसीलदार सुराणा यांनी केले.

