भटक्या कुत्र्ऱ्यांना रस्त्यांवरुन हटवा सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्यांना आदेश..
24 प्राईम न्यूज 8 Nov 2025

भटक्या कुत्र्यांशी संबंधित एका प्रकरणात राजस्थान उच्च न्यायालयाचा निकाल देशभर लागू करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. या निर्णयानुसार सर्व रस्ते, राज्य /राष्ट्रीय महामार्गावरून भटके कुत्रे आणि भटक्या गुराढोरांना हटवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय

खंडपीठाने सर्व राज्यांना दिले. या आदेशाचे काटेकोरपणे पालन न झाल्यास स्थानिक अधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरले जाईल, असा इशाराही खंडपीठाने दिला.सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता व न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात सुनावणी झाली. या सुनावणीत खंडपीठाने या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाकडे दिली आहे. येत्या २ आठवड्यांमध्ये अशा सर्व सार्वजनिक ठिकाणांची यादी प्रशासनाने तयार करावी आणि त्यानुसार कार्यवाही करावी, असेही सांगितले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, ८ आठवड्यांनंतर १३ जानेवारी २०२६ रोजी केलेल्या कारवाईसंदर्भातला अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक प्रशासनाबरोबरच सार्वजनिक संस्थांवरही भटक्या कुत्र्यांची जबाबदारी सोपवली आहे. शैक्षणिक संस्था, रुग्णालये, क्रीडा संकुले, बस स्थानक, रेल्वे स्थानक अशा संस्थांच्या व्यवस्थापनाने या मोहिमेवर देखरेख ठेवण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक करावी. संबंधित संस्थेचा परिसर स्वच्छ ठेवून भटके कुत्रे संस्थेच्या परिसरात प्रवेश करणार नाहीत, याची खातरजमा करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यावर असेल, असे न्यायालयाने नमूद केले आहे. हे आदेश हे सर्व राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना लागू असतील, असे न्यायालयाने आपल्या आदेशातून सांगितले आहे.

