प्रेमविवाह रजिस्ट्रेशनसाठी पालकांची अनुमती बंधनकारक करण्याची मागणी — अमळनेरमध्ये भारत जागृत मंचकडून तहसीलदारांना निवेदन.

0
New-Doc-11-05-2025-10.13.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर — महाराष्ट्र राज्यात वाढत्या प्रेमविवाहांच्या घटनांमुळे कुटुंब व्यवस्था धोक्यात येत असल्याने, अशा विवाहांचे रजिस्ट्रेशन करताना पालकांची अनुमती आवश्यक करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी भारत जागृत मंच मार्फत पालकांच्या स्वाक्षऱ्यांसह निवेदन आज दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी अमळनेर तहसीलदारांना सादर करण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, आज अनेक तरुण मुलं-मुली पालकांच्या परवानगीशिवाय घरातून पळून जाऊन विवाह करतात, ज्यामुळे सामाजिक व कौटुंबिक तणाव निर्माण होत आहेत. प्रेमविवाहाच्या नावाखाली अनेक गुन्हेगारी प्रवृत्ती समाजात वाढताना दिसत असून, काही प्रकरणांत जीवितहानीसुद्धा झाली आहे. त्यामुळे अशा विवाहांवर कायदेशीर नियंत्रण आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

भारतीय परंपरा आणि कौटुंबिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी विवाहाच्या वेळी दोन्ही बाजूंच्या आई-वडिलांची उपस्थिती आणि अनुमती बंधनकारक करावी, अशी ठाम भूमिका निवेदनात व्यक्त करण्यात आली.

या उपक्रमाचे नेतृत्व संतोष पाटील, अमळनेर तालुका अध्यक्ष (प्रहार जनशक्ती पक्ष) व भारत जागृत मंच महाराष्ट्र अध्यक्ष यांनी केले. त्यांनी सांगितले की, “धर्मांतर कायद्यात जशी पालकांच्या अनुमतीची अट घालण्यात आली आहे, तशीच अट विवाह रजिस्ट्रेशन करतानाही असावी. अन्यथा कुटुंब व्यवस्था कोलमडण्याचा धोका निर्माण होईल.”

निवेदनाची प्रत लोकसभा, विधानसभा, विभागीय आयुक्त नाशिक, जिल्हाधिकारी जळगाव आणि प्रांत अधिकाऱ्यांना सुद्धा पाठविण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed