वंदे मातरम गीताचा १५० वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी अमळनेर तहसील कार्यालयात बैठक संपन्न..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर —वंदे मातरम गीताला ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण होत असल्याने या ऐतिहासिक वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात अमळनेर तहसील कार्यालयात आज (ता. ४ नोव्हेंबर) तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

या बैठकीत राज्य शासनाच्या निर्देशानुसार सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ‘वंदे मातरम’ गीतगायन, देशभक्तीपर भाषणे, वकृत्व व निबंध लेखन स्पर्धा आदी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून अमळनेर तालुक्यातील नियोजनासाठीही मार्गदर्शन करण्यात आले.

या अनुषंगाने ता. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता अमळनेर येथील साने गुरुजी शाळेत प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सुमारे पाच हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या समूहातून ‘वंदे मातरम’ गीतगायनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
बैठकीस गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्र्यय निकम, संदीप घोरपडे, मेघराज महाजन, अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील, पत्रकार बाबुलाल पाटील, आशिष चौधरी, दत्तात्रय सोनवणे, पंकज भावसार, चंद्रकांत मुसळे, बापू संदानशिव, दिलीप भावसार, विलास बोरसे, प्रभारी प्राचार्य विजय वाणी, अनिल दुसाने, डी. एस. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व नागरिकांनी सकाळी साडे नऊ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

