अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सभापती अशोक आधार पाटील यांचा आदर्श निर्णय. वाढदिवसाचा खर्च शेतकरी मदतीसाठी देणार.

0
New-Doc-11-05-2025-00.27.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर — अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर एक आदर्श निर्णय घेतला आहे. त्यांनी यंदा आपला वाढदिवस साजरा न करता वाढदिवसाचा सर्व खर्च आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत स्वरूपात देण्याची घोषणा केली आहे.

सदर निर्णयामुळे परिसरात त्यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरवर्षी सभापती पाटील यांचा वाढदिवस कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी, आधार फाउंडेशनचे कार्यकर्ते, विविध शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी आणि मित्रमंडळ यांच्या सहभागाने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यावर्षी अमळनेर तालुक्यासह मुडी मांडळ जिल्हा परिषद गटातील वासरे, खेडी, खर्दे या गावांतील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्याने त्यांनी हा सामाजिक निर्णय घेतला आहे.

सभापती पाटील यांच्या अर्धांगिनी आणि आधार फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. योगिता अशोक पाटील या स्वतःही शेतकरी कुटुंबीयांच्या समस्येत सहभागी होत आहेत. त्या जिल्हा परिषद गटातील गावांना भेट देऊन शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेत आहेत.

अशोक पाटील यांनी सांगितले की, “माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या मित्रपरिवार, हितचिंतक व कर्मचारी वृंद यांनी मला भेटवस्तू वा पुष्पगुच्छ देण्याऐवजी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत केल्यास माझा वाढदिवस खऱ्या अर्थाने शेतकरी पुत्राला शोभणारा साजरा झाल्याचे समाधान लाभेल.”

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांतून सभापती पाटील यांच्या संवेदनशीलतेचे आणि समाजाभिमुख दृष्टिकोनाचे कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed