साने गुरुजी विद्यालयात गायन-वादन शाळेचा यशस्वी समारोप विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांना वाव, संगीताच्या माध्यमातून ताणतणावावर मात…
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि मोबाईल तसेच टीव्हीपासून दूर ठेवून सृजनशीलतेकडे वळविण्याच्या उद्देशाने गायन-वादन शाळेचे आयोजन करण्यात आले. दहा दिवस चाललेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांमध्ये संगीताबद्दलची आवड आणि संवेदनशीलता वृद्धिंगत झाली.

या कार्यशाळेत संगीत शिक्षक म्हणून तुषार पुराणिक यांनी मार्गदर्शन केले. तसेच बेथेल चर्चचे फादर गावित आणि खानदेशातील प्रख्यात बासरी वादक व प्रचारक योगेश पाटील यांनीही विशेष सत्रांमधून विद्यार्थ्यांना संगीत क्षेत्राचा जवळून परिचय करून दिला.

या कार्यशाळेची संकल्पना संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील आणि शिक्षणतज्ज्ञ तसेच रंगकर्मी यांच्या पुढाकारातून साकार झाली. संचालक मंडळासह मुख्याध्यापक अनिता बोरसे, सुनील पाटील आणि संजीव पाटील यांनी विद्यार्थ्यांना सहभागासाठी प्रोत्साहित केले, तसेच इतर शाळांतील संगीतप्रेमी विद्यार्थ्यांनाही सहभागी होण्याचे आवाहन केले.
दहा दिवसांच्या या संगीतमय कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी बासरीवर राष्ट्रगीत सादर केले, तबल्याचे प्रारंभिक बोल शिकले आणि कीबोर्डचे प्रशिक्षण घेतले. मुलांनी या कालावधीला “आनंदी आणि अविस्मरणीय अनुभव” असे वर्णन केले.
कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी रंगकर्मी संदीप घोरपडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “संगीत हे जीवनातील तणाव घालवून आनंद निर्माण करणारे माध्यम आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कलावंत दडलेला असतो — त्याला योग्य दिशा मिळणे आवश्यक आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांना १४ विद्या आणि ६४ कलांचा परिचय देत जीवनात कला आत्मसात करण्याचे महत्त्व सांगितले.
या कार्यशाळेत वैभव भैय्यासाहेब पाटील, मीत योगेश पाटील, निलय प्रसाद ओवे, अर्चना निंबा चव्हाण, विआन स्वप्नील पाटील आणि अन्वी पाटील या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला व संगीताचा आनंद लुटला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पुढील कलाप्रवासासाठी शुभेच्छा देत गायन-वादन शाळेचा समारोप झाला.

