३५ वर्षांचा विजेच्या खांबाचा त्रास संपायचा नाव नाही; आता खड्ड्यांनी निर्माण केली नवीन संकटाची परिस्थिती.                                   ठेकेदार बोंडे यांच्या निष्काळजीपणावर नागरिकांचा संताप..

0
New-Doc-11-03-2025-22.57.jpg


आबिद शेख/ अमळनेर


अमळनेर शहरातील गांधलीपुरा परिसरातील पारधी वाड्यातील शेख युनूस हकीम बेलदार हे तब्बल ३५ वर्षांपासून घरासमोर उभ्या असलेल्या विजेच्या खांबामुळे त्रस्त होते. घरासमोरच खांब असल्याने ये-जा करण्यास अडचणी निर्माण होत होत्या, तर विजेच्या तारांचा कायम धोका होता. अखेर कार्यकारी अभियंता तुषार नेमाडे आणि अभियंता हेमंत सैंदाणे यांनी खांब हलवण्यास मंजुरी दिली. मात्र, मंजुरीनंतरही बेलदार यांच्या कुटुंबाला दिलासा मिळालेला नाही.

खांब हलवण्याचे काम ठेकेदार बोंडे यांना देण्यात आले होते. सुरुवातीला काही खड्डे खोदले गेले, पण त्यानंतर ना ठेकेदार ना वायरमन दिसले. तब्बल २० दिवसांपासून हे खड्डे उघडेच पडले असून, परिसरातील नागरिकांसाठी धोका निर्माण झाला आहे. विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

“एखादे मूल या खड्ड्यात पडून अपघात झाला तर जबाबदार कोण?” असा सवाल बेलदार यांनी उपस्थित केला आहे.

स्थानिक नागरिकांनीही ठेकेदाराच्या ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त केला आहे. “बोंडे यांची अनेक कामे अशाच पद्धतीने अधांतरी राहिली आहेत. वेळेत काम पूर्ण होत नाही आणि जबाबदारी झटकली जाते,” अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

नागरिकांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून हे काम पूर्ण करावे, खड्डे त्वरित भरावेत आणि नागरिकांचा त्रास संपवावा, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed