पिंपळे खु येथे महिनाभरात तीन चोरीच्या घटना; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण — CCTV कॅमेऱ्यांची मागणी..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर तालुक्यातील पिंपळे खु या गावात गेल्या एका महिन्यात सलग तीन चोरीच्या घटना घडल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीकडून आवश्यक सुरक्षाव्यवस्था न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, तातडीने CCTV कॅमेरे बसवावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ ऑक्टोबर रोजी एका नागरिकाची यूनिकॉन दुचाकी चोरीला गेली, त्यानंतर दि. २० ऑक्टोबर रोजी दोन बैल व एक गाय चोरीला गेली, आणि दि. १ नोव्हेंबर रोजी भरदिवसा शनिमहाराज मंदिरातील चांदीचा मुकुट चोरीला गेला. या सलग चोऱ्यांमुळे गावातील नागरिकांमध्ये संताप आणि असुरक्षिततेची भावना वाढली आहे.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, या सर्व घटनांनंतरही ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई किंवा सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेली नाही. गावात CCTV कॅमेरे नसल्यामुळे चोरट्यांना वाव मिळत आहे.
ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाकडे या सर्व घटनांचा तपास वेगाने करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी गावात CCTV कॅमेरे बसवण्याची मागणी केली आहे.

