अमळनेर तालुक्यातील ११ गावांतील महिलांची खोकरपाठ येथील ‘शंभू महिला शेतकरी गटा’कडे अभ्यासभेट. शाश्वत शेती, जल-मृदा संवर्धन व गटव्यवसायांचा प्रत्यक्ष अनुभव..

0
New-Doc-11-03-2025-22.46.jpg

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर — अमळनेर तालुक्यातील खोकरपाठ येथील ‘शंभू महिला शेतकरी गट’ यांच्या यशस्वी गटशेती उपक्रमाचा अभ्यास करण्यासाठी तालुक्यातील ११ गावांतील शेकडो महिला शेतकऱ्यांनी अभ्यासभेट दिली. जल व मृदा संवर्धन, शाश्वत शेती पद्धती आणि गटव्यवसायांच्या प्रात्यक्षिकांचा या महिलांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला.

ही भेट राष्ट्रविकास अ‍ॅग्रो एज्युकेशन संस्था, अमळनेर यांच्या माध्यमातून आय.डब्ल्यू.एम.पी. (IWMP) योजनेच्या कार्यक्षेत्रांतर्गत आयोजित करण्यात आली होती. भिलाली, एकतास, एकलहरे, पाडसे, तांदळी, शहापूर, खेडी, खर्दे, वासरे, निंब व कळमसरे या गावांतील महिला शेतकरी सहभागी झाल्या होत्या.

खोकरपाठ येथील शंभू महिला शेतकरी गटाने ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ स्पर्धेत सहभाग घेतला असून, गेल्या दोन वर्षांपासून विषमुक्त कापूस व मका पीक उत्पादनात नैसर्गिक कीडनियंत्रण (Natural Pest Management) पद्धतीचा यशस्वी अवलंब केला आहे. गटाच्या माध्यमातून गांडूळखत निर्मिती, टोकण यंत्र व कृषी अवजार भाडेतत्त्वावर देण्याचे उपक्रम, वृक्षारोपण तसेच जल व मृदा संधारणाची विविध कामे सातत्याने राबवली जात आहेत.

या अभ्यासभेटीदरम्यान गटातील संगीता पाटील, रेखा पाटील व सुलभा पाटील यांनी गटशेतीच्या कार्यपद्धतीबाबत तसेच पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

या भेटीद्वारे महिलांना शाश्वत शेतीचे फायदे, गटशेतीचे महत्त्व व जल-मृदा संवर्धनाची गरज यांचा प्रत्यक्ष अनुभव आला. उपस्थित महिलांनी या यशस्वी प्रयत्नांचे कौतुक करत आपल्या गावांमध्येही अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed