नावातील बदल अर्जाना स्वयंचलित मंजुरी : महावितरणकडून डिजिटल सेवेत मोठी झेप..
24 प्राईम न्यूज 1 Nov 2025


– ग्राहक सेवेतील दर्जा आणि गती वाढवण्यासाठी महावितरणने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वीजबिलावरील ग्राहक नावातील बदल (Name Change) अर्जांना आता स्वयंचलित मंजुरी देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
या नव्या सुविधेमुळे आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून आणि प्रक्रिया शुल्क भरल्यानंतर केवळ तीन ते सात दिवसांत वीजबिलावरील ग्राहक नाव बदलाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यापूर्वी या प्रक्रियेस कृती मानकानुसार एक महिन्याचा कालावधी लागत होता.
घर खरेदी-विक्री, वारसा हक्क अथवा मालकी बदल झाल्यास वीजबिलावरील नाव बदलण्यासाठी ग्राहक अर्ज सादर करतात. आता ही प्रक्रिया महावितरण मोबाईल अॅप तसेच संकेतस्थळ www.mahadiscom.in द्वारे पूर्ण करता येईल. ग्राहकांनी लॉगिन करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आणि प्रक्रिया शुल्क भरायचे इतकेच.

अशी असेल प्रक्रिया :
ऑनलाइन अर्ज आणि अपलोड केलेल्या कागदपत्रांची उपविभाग कार्यालयाकडून तपासणी
काही त्रुटी आढळल्यास ग्राहकाला नोंदणीकृत मोबाईलवर त्वरित एसएमएसद्वारे कळविणे
नाव बदल प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुष्टीचा संदेश ग्राहकाला मिळणे
या स्वयंचलित मंजुरी प्रणालीमुळे विशेषतः घरगुती ग्राहकांसह इतर वर्गातील ग्राहकांनाही महावितरणच्या डिजिटल सेवेचा तत्पर आणि पारदर्शक लाभ मिळणार आहे.

