खा. स्मिताताई वाघ यांच्या पुढाकाराने जळगावात ‘प्रगतीशील महाराष्ट्र २०२५’ प्रदर्शनाचे आयोजन; केंद्र-राज्य सरकारच्या योजनांची जनजागृती..

0
New-Doc-11-01-2025-23.41.jpg

24 प्राईम न्यूज 2 Nov 2025
जळगाव : भारतीय जनतेच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने राबविलेल्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘प्रगतीशील महाराष्ट्र २०२५’ या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. ३ नोव्हेंबर ते बुधवार दि. ५ नोव्हेंबर दरम्यान जळगावच्या शिवतीर्थ (जीएस ग्राऊंड) येथे हे त्रिदिवसीय प्रदर्शन पार पडणार आहे.

या प्रदर्शनाचा पुढाकार लोकप्रिय खासदार स्मिताताई वाघ यांनी घेतला असून, आयोजन दिल्लीतील फ्रेंड्ज एक्झीबिशन अँड प्रमोशन या संस्थेमार्फत करण्यात आले आहे. ‘एक उन्नत राष्ट्र की और..’ या घोषवाक्याखाली हे प्रदर्शन दररोज सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते होणार असून, पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार राजूमामा भोळे, मंगेश चव्हाण, अनिल पाटील, चंद्रकांतदादा पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पत्रकार परिषदेत खासदार स्मिताताई वाघ म्हणाल्या की, “या प्रदर्शनात केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती देणारे विभागीय स्टॉल्स असतील. कृषी, ग्रामीण विकास, विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरण, मत्स्य पालन, उर्जा, उद्योग, विमा, आरोग्य, शिक्षण, बांधकाम, नागरी विकास अशा विविध क्षेत्रातील योजनांची माहिती नागरिकांना एका ठिकाणी मिळेल.”

या पत्रकार परिषदेला भाजपा जिल्हाध्यक्ष (महानगर) दीपक सूर्यवंशी, भाजपा जिल्हाध्यक्ष (पश्चिम) डॉ. राधेश्याम चौधरी, तसेच फ्रेंड्ज एक्झिबिशनच्या संचालिका अखिला श्रीनिवासन, आनंद पाल, दीपकसिंग मेहता, साक्षी सैनी आदी मान्यवर उपस्थित होते.

शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संधी:
या प्रदर्शनाच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी शोध प्रकल्प स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे विज्ञान व तंत्रज्ञान विषयक प्रकल्प येथे प्रदर्शित करण्यात येणार असून, विजेत्यांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.

‘प्रगतीशील महाराष्ट्र २०२५’ हे प्रदर्शन जळगावकरांसाठी ज्ञान, विज्ञान आणि विकासाचे अनोखे व्यासपीठ ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed