औट्रम घाटात ५.५० किमी लांबीच्या बोगद्याला केंद्र सरकारची मंजुरी. — खासदार स्मिता वाघ. ₹२,४३५ कोटींच्या प्रकल्पामुळे खान्देश–मराठवाडा प्रवास होणार अधिक सुरक्षित आणि सुलभ..

0
New-Doc-10-26-2025-20.39.jpg

आबिद शेख/ अमळनेर

जळगाव :धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील औट्रम घाट हा राज्यातील सर्वाधिक धोकादायक घाट म्हणून ओळखला जातो. अनेक वर्षांपासून या घाटावर अपघात, वाहतूक कोंडी आणि विलंबामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अखेर औट्रम घाटातील ५.५० किलोमीटर लांबीच्या अत्याधुनिक बोगद्याच्या बांधकामास मंजुरी दिली असून, या प्रकल्पावर तब्बल ₹२,४३५ कोटी खर्च होणार आहे.

हा बोगदा टेलवाडी ते बोधरे या सुमारे १५ किलोमीटरच्या टप्प्यात उभारला जाणार आहे. या बोगद्यामुळे संभाजीनगर–पुणे दरम्यानचा प्रवास वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून अपघातांचे प्रमाण घटेल.

खासदार स्मिता वाघ म्हणाल्या, “औट्रम घाट आता इतिहासजमा होणार आहे. या घाटात अनेक अपघात झाले, नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. सुरक्षित बोगद्याची जनतेची मागणी पूर्ण झाली असून, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या विकास प्रवासात ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यातील रस्त्यांचे आधुनिकीकरण वेगाने सुरू आहे. या बोगद्यामुळे इंधन बचत, वेळेची बचत, अपघातांमध्ये घट आणि पर्यावरणावरचा ताण कमी होईल.”

या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, खासदार स्मिता वाघ आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी केला. केंद्र सरकारच्या या निर्णयाबद्दल सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.

प्रकल्पाचे तांत्रिक तपशील :

बोगद्याची लांबी: ५.५० किलोमीटर रस्त्याचा विस्तार: टेलवाडी ते बोधरे – १५ किलोमीटर एकूण प्रकल्प खर्च: ₹२,४३५ कोटी वाहन वेग: ताशी १०० किलोमीटरपर्यंत रचना: डबल ट्यूब स्ट्रक्चर, अत्याधुनिक वायुवीजन, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग सुरक्षा सुविधा: फायर सिस्टिम, डिजिटल सेन्सर, सीसीटीव्ही, वाहन नियंत्रण केंद्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed