दिवाळीनिमित्त पालिका कामगारांचा सन्मान — माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांचा स्तुत्य उपक्रम..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर दिवाळी हा आनंद, एकोप्याचा आणि आपुलकीचा सण. या सणानिमित्त अमळनेर नगरपालिकेतील विविध विभागातील कामगारांना भेटवस्तू देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचा उपक्रम माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी यंदाही राबविला.

प्रभाग क्रमांक 1 मध्ये अनेक वर्षांपासून नित्यनियमाने हा उपक्रम राबविला जात असून, वर्षभर शहराच्या स्वच्छतेपासून पाणीपुरवठा आणि दिवाबत्तीपर्यंत कार्यरत असलेल्या कामगारांच्या सेवेला मानाचा मुजरा करण्याचा हेतू यामागे आहे.

साफसफाई विभाग, पाणीपुरवठा विभाग तसेच दिवाबत्ती विभागातील कर्मचाऱ्यांना श्री. चौधरी यांनी सप्रेम भेटवस्तू देऊन सन्मानित केले. या प्रसंगी त्यांनी कामगारांशी संवाद साधत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आणि त्यांच्या आनंदात सहभागी होत दिवाळी साजरी केली.
या उपक्रमाबद्दल सर्व कामगारांनी माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आणि अशा उपक्रमांमुळे काम करण्यास अधिक ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असल्याचे मत व्यक्त केले.

