अमळनेर : शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेच्या पायावर उभारलेली अमळनेर येथील प्रताप हायस्कूल ही संस्था यंदा आपल्या गौरवशाली परंपरेचा उत्सव साजरा करणार आहे. सन १९०८ मध्ये स्थापन झालेल्या या विद्यालयात साने गुरुजींसारख्या महान व्यक्तींनी शिक्षक म्हणून कार्य करून शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला. या परंपरेचा गौरव राखत “माजी विद्यार्थी स्नेहमेळावा २०२५” चे आयोजन करण्यात आले आहे.
हा स्नेहमेळावा शनिवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत प्रताप हायस्कूल प्रांगणात पार पडणार आहे.
कार्यक्रमास मा. श्री. जितेंद्र झबक (अध्यक्ष, खा. शी. मंडळ अमळनेर), मा. डॉ. अनिल शिंदे (अध्यक्ष, व्यवस्थापन समिती, प्रताप हायस्कूल), मा. डॉ. संदेश गुजराथी (कार्याध्यक्ष, खा. शी. मंडळ), मा. डॉ. एस. आर. चौधरी (प्राचार्य माजी, प्रताप कॉलेज, अध्यक्ष – स्नेहमेळावा २०२५), व मा. श्री. सिद्धार्थ निकम (मुख्याध्यापक, प्रताप हायस्कूल) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात शिक्षकांचा सन्मान व सत्कार समारंभ, “My School – My Pride” अनुभव कथन सत्र, सांस्कृतिक कार्यक्रम, हास्य-मनोरंजन आणि स्नेहभोजन अशी आकर्षक रूपरेषा ठेवण्यात आली आहे.
माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि शाळाप्रेमींनी उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
“खरा तो एकच धर्म – जगाला प्रेम अर्पावे” — साने गुरुजी