तांबेपुरा-सानेनगर भागाला अखेर नवा रस्ता; आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर :स्वातंत्र्यपूर्व काळापासून रस्ता नसलेल्या तांबेपुरा, सानेनगर परिसरासह दहा गावांना जोडणारा नवा काँक्रीट रस्ता होणार असून, या दोन कोटी रुपयांच्या रस्त्याचे भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
शहरातील तांबेपुरा आणि सानेनगर भागात जाण्यासाठी सध्या विप्रो कंपनीजवळील रेल्वे बोगद्यातून जाणारा एकमेव रस्ता आहे. परंतु हा रस्ता रेल्वे विभागाच्या नियमानुसार वाहतुकीसाठी बंद असून, प्रत्यक्षात पाण्याचा निचरा करण्यासाठीचा नाला आहे. तरीही दशकानुदशके या मार्गाचा वापर नागरिक करत आहेत. पावसाळ्यात या बोगद्यात पाणी साचल्याने वाहतूक ठप्प होते, तसेच मोठी वाहने, बस किंवा विप्रो कंपनीतील ट्रक यांना जाण्यास अडचण येते.

या समस्येचा कायमस्वरूपी तोडगा म्हणून आमदार अनिल पाटील यांनी प्रताप कॉलेज–मारवड रस्ता ते तांबेपुरा असा सुमारे दोन कोटी रुपयांचा काँक्रीट रस्ता मंजूर केला आहे. या रस्त्याचे भूमिपूजन झाल्याने परिसरातील नागरिकांनी आमदार पाटील यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.

त्याच कार्यक्रमात माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांच्या पुढाकाराने बंगाली फाईल भागात शुद्ध व थंड पाण्याचे यंत्र सुरू करण्यात आले. या उपक्रमांतर्गत नागरिकांना वाहनाद्वारे मोफत पाणी घरपोच दिले जाणार आहे.
या कार्यक्रमास तालुकाध्यक्ष भागवत पाटील, रिटा बाविस्कर, मुक्तार खाटीक, सचिन पाटील, गोविंदा बाविस्कर, नरेंद्र चौधरी, कैलास पाटील, देवेंद्र पवार, अरुण संदानशीव, सलीम टोपी, नरेंद्र संदानशीव, तसेच तांबेपुरा, सानेनगर, बंगाली फाईल, अयोध्या नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

