लाडक्या बहिणींना ‘ई-केवायसी’ स्थगितीची भाऊबीज भेट..
24 प्राईम न्यूज 23 Oct 2025

राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेत सहभागी महिलांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांच्या वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ‘ई-केवायसी’ प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो लाभार्थी महिलांना भाऊबीजेच्या मुहूर्तावर दिलासा मिळाला आहे.

‘लाडकी बहीण’ योजनेत लाभ घेण्यासाठी सरकारने अलीकडेच ‘ई-केवायसी’ सक्तीची केली होती. त्यामुळे अनेक महिला रात्री जागून केंद्रे, सायबर कॅफे येथे ‘ई-केवायसी’साठी गर्दी करत होत्या. या प्रक्रियेमुळे महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलावर्गाचा रोष टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

दरम्यान, योजनेच्या पात्रतेसाठी करण्यात आलेल्या छाननीत अनेक लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आले. चारचाकी वाहनधारक महिला, सरकारी नोकरीतील महिला, केंद्र व राज्य सरकारच्या इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या तसेच एका कुटुंबातील अनेक लाभार्थी भगिनींना या योजनेतून वगळण्यात आले आहे. वयाचे चुकीचे नोंदवही, निकषांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांनाही अपात्र ठरवले गेले आहे. या छाननीमुळे तब्बल ४५ लाख लाडक्या बहिणींना धक्का बसला होता.
‘लाडकी बहीण’ योजना गेल्या वर्षी सुरू झाली असून ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यात २ कोटी ५६ लाख महिलांनी अर्ज सादर केले होते. या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपयांची थेट मदत जमा केली जाते. आतापर्यंत ऑगस्ट २०२५ पर्यंतचे १४ हप्ते वितरित झाले आहेत. सप्टेंबर महिन्याचा निधी उपलब्ध झाल्याने लवकरच तो लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी अपेक्षा आहे.
भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर सरकारचा हा निर्णय महिलांसाठी दिलासा देणारा ठरत असून, महिलांच्या मनातील नाराजी दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न म्हणून पाहिला जात आहे.

