कळमसरे-प्र.डांगरी जि.प. गटासाठी पुढच्या पिढीला संधी देण्याची साद — गौतम पाटील यांच्या उमेदवारीचा युवा पदाधिकाऱ्यांकडून आग्रह..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर तालुक्यातील आमदार अनिलदादा पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. जयश्रीताई पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळमसरे-प्र.डांगरी जिल्हा परिषद गट खुला झाल्याने आता या गटातून पुढच्या पिढीला संधी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यामध्ये विशेषतः गौतम अनिल पाटील यांना उमेदवारी द्यावी, असा युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा एकमुखी आग्रह आहे.

गौतम पाटील हे सिव्हिल इंजिनिअर असून त्यांनी अमेरिकेतून कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटचे उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुन्हा मायदेशी परत येत आपल्या कुटुंबाचा कन्स्ट्रक्शन व्यवसाय यशस्वीरित्या सांभाळत आहेत. सामाजिक जाण, प्रगल्भ विचारसरणी, सुस्वभावी व्यक्तिमत्व आणि काहीतरी नवीन घडविण्याची जिद्द या गुणांमुळे त्यांना तरुणांमध्ये विशेष लोकप्रियता मिळाली आहे.
गावागावातील तरुणांनी केलेल्या चर्चांमध्ये “गौतम पाटील यांनी या गटातून राजकारणात प्रवेश करावा,” अशी मागणी मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे. या मागणीचे स्वरूप अधिकृत करण्यासाठी गटातील युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार अनिल पाटील यांना निवेदन सादर केले.

या प्रसंगी आमदार अनिल पाटील, माजी जि.प. सदस्या जयश्री पाटील आणि गौतम पाटील यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. तर “आमदारांनी त्यांच्या बालेकिल्ल्यात उच्चशिक्षित आणि कार्यक्षम युवा नेतृत्वाला संधी द्यावी; आम्ही ती संधी सोने करून दाखवू,” असा विश्वास युवा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष करण साळुंखे, तसेच गौरव रावसाहेब पाटील, संग्राम पाटील, कल्पेश साळुंखे, योगेश पाटील, चेतन चौधरी, सचिन साळुंखे, ऋषिकेश पाटील, पीयूष वानखेडे, दर्शन सुर्वे, लोकेश झंवर, सनी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

