गडखांब रस्त्यावर भीषण अपघात — लक्झरी बसच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू..

0
New-Doc-10-20-2025-09.26.jpg

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर — तालुक्यातील गडखांब रस्त्यावर भरधाव लक्झरी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, गडखांब येथील दिनेश सदाशिव पाटील (वय 26) हा तरुण सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुचाकी (क्र. MH 19 CP 2987) वरून दहिवद फाट्याकडे जात होता. त्यावेळी चोपड्याकडून अमळनेरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या राजमुद्रा लक्झरी बसने (क्र. MH 09 EM 9063) ओव्हरटेक करताना दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत मोटरसायकलसह तरुणास सुमारे 50 फूट फरफटत नेण्यात आले.

मागून येणाऱ्या नातेवाईकांनी बस थांबवली असता दिनेश हा बंपरखाली अडकलेला होता. नागरिकांनी त्याला बाहेर काढून तत्काळ अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मृत तरुणाच्या काका विनोद भागवत पाटील यांच्या फिर्यादीवरून लक्झरी बस चालक चुनीलाल सुभाष बडगुजर (रा. चोपडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेकॉ विजय भोई करत आहेत.

अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून रस्त्यावरील वाहनचालकांच्या बेफिकीर वेगावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed