“दुष्काळ, अतिवृष्टी, भावपातळी – शेतकऱ्यांचा संताप उफाळला; अमळनेरकडे दुर्लक्ष का?”
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप जोर धरू लागला आहे. चाळीसगाव तालुक्यात 2023 मध्ये 101 कोटींचा निधी मंजूर होऊन दुष्काळ जाहीर झाला, मात्र याच काळात अमळनेर तालुक्यात कमी पर्जन्यमान असूनही दुष्काळ जाहीरच झाला नाही.

2021 मध्ये अतिवृष्टीमुळे पंचनामे झाले, परंतु शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी लोकशाही मार्गाने आपली मागणी मांडत आहेत — दहा वेळा निवेदनं दिली, मोर्चे काढले, आंदोलन केले — तरीही संबंधित अधिकाऱ्यांकडून वा लोकप्रतिनिधीकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

या वर्षी अमळनेर तालुक्यात संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला आहे. अमळनेर हा अवर्षण आणि प्रवर्षण क्षेत्रात मोडत असून परिस्थिती गंभीर आहे. तरीही लोकप्रतिनिधी आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
“काही संतापाने बोललो तर नेत्यांना बाप मानणारी ओउलाद आंदोलन करते, पण आपल्या कष्टकरी बापावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध मात्र कुणीच आवाज उठवत नाही,” असा रोष शेतकऱ्यांत व्यक्त होत आहे.

कापसाला केवळ ₹6,500 आणि मक्याला ₹1,350 ते ₹1,700 दर मिळत आहेत. सरकारी खरेदी अजूनही सुरू झालेली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न आता फक्त मदतीचा राहिलेला नाही, तर “आम्ही काय करावे?” या टप्प्यावर पोहोचला आहे. तातडीने मदत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.

