तिरंगा चौकात रिक्षांचा मनमानीपणा — वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण..
अमळनेर अमळनेर शहरातील तिरंगा चौक आणि कोंबडी बाजार परिसरात बेकायदा व बेशिस्त रिक्षा उभ्या राहिल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या तीव्र झाली आहे. सकाळी आणि दुपारी शाळेच्या वेळेत पेजो रिक्षांची मोठ्या प्रमाणावर बेशिस्तपणे उभ्या असतात ज्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या परिसरात शाळा असल्याने लहान मुलांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रिक्षाचालकांचा मनमानीपणा वाढत असून अपघाताची शक्यता सतत निर्माण होते आहे.
नागरिकांनी या समस्येबाबत प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन रिक्षांच्या पार्किंगसाठी योग्य व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. अन्यथा एखादा मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
