जामनेर विद्यार्थ्याच्या न्यायासाठी आणि रोजगारनिर्मितीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा पुढाकार..
24 प्राईम न्यूज 16 Oct 2025

जळगाव (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या न्याय आणि रोजगाराच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेत (अजित पवार गट) सक्रिय झाली आहे. जळगाव लोकसभा पातळीवर जामनेर शहरातील विद्यार्थ्याच्या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी रोजगारनिर्मिती करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष अजहर शेख यांनी विद्यार्थी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम पाटील यांच्याशी फोनवर सविस्तर चर्चा केली. या चर्चेत जामनेरमधील विद्यार्थी सुलेमान शेख यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर आणि संघटनात्मक पातळीवरील उपाययोजनांवर विचारविनिमय झाला. “विद्यार्थ्यांवरील अन्याय सहन केला जाणार नाही, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस त्यासाठी ठामपणे लढा देईल,” असे अजहर शेख यांनी स्पष्ट केले.

तसेच, जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी रोजगार आणि करिअर संधी वाढविण्यासाठी “जॉब कॅम्प” आयोजित करण्याची प्राथमिक रूपरेषा देखील तयार करण्यात आली आहे. या उपक्रमात उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, प्रशिक्षण संस्था आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.
या विषयांवर पुढील तपशीलवार चर्चा करण्यासाठी अजहर शेख लवकरच छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहेत.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी, शिक्षणासाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. “विद्यार्थ्यांच्या आवाजाला व्यासपीठ देणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे हेच आमचे ध्येय आहे,” असे अजहर शेख यांनी सांगितले.

