वृद्धाचा पाठलाग करून पैसे लुटण्याचा प्रयत्न अयशस्वी — तरुणाच्या तत्परतेमुळे चोरी अपयशी..

0
New-Doc-10-16-2025-08.29.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर शहरातील पैलाड परिसरात दुपारी घडलेल्या एका धाडसी घटनेत वृद्धाचा बँकेतून पाठलाग करून पन्नास हजार रुपयांची बॅग हिसकावून पळण्याचा प्रयत्न अल्पवयीन चोरट्याने केला. मात्र, रोहित भागवत पाटील या तरुणाच्या तत्परतेमुळे हा चोरीचा प्रयत्न फसला.

१३ ऑक्टोबर रोजी तुकाराम भोई हे बडोदा बँकेतून ₹५०,००० काढून मोटरसायकलच्या डिक्कीत ठेवून घरी निघाले होते. त्यावेळी दोन मुलांनी स्कूटीवरून त्यांचा पाठलाग केला. काही अंतरावर स्कूटी थांबवत अल्पवयीन मुलाला वृद्धाजवळ पाठवण्यात आले. तुकाराम भोई हे पैसे काढत असतानाच अल्पवयीन चोरट्याने पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला.

तेवढ्यात जवळच असलेल्या रोहित भागवत पाटील यांनी झडप घालून त्या मुलाला पकडले व पैसे सुरक्षित परत मिळवून दिले. दुसरा आरोपी मात्र स्कूटीसह पसार झाला. रोहित पाटील यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलीस कॉन्स्टेबल मंगल भोई व हेडकॉन्स्टेबल विनोद भोई यांनी पकडलेल्या मुलाला पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासमोर हजर केले.

विचारपूस केल्यानंतर अल्पवयीन मुलाने सांगितले की ते दोघे मध्यप्रदेशातून रेल्वेने अमळनेरला आले होते. स्कूटी घेऊन बँकेजवळ येऊन वृद्धाचा पाठलाग करून पैसे लुटण्याची योजना आखली होती. या प्रकरणी दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

पोलीस तपासात समोर आले की मध्यप्रदेशातील एका गावात बॅग लिफ्टिंग करणारी टोळी कार्यरत असून अल्पवयीन मुलांचा वापर करून चोरी केली जाते आणि चोरीतील हिस्सा गावच्या प्रमुखाला दिला जातो.

नागरिकांनी बँकेत जाताना अधिक सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed