फैजपूरमध्ये मतदार यादीत मोठी गडबड — 2,000 मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात!

0
New-Doc-10-15-2025-09.37.jpg

फैजपूर (प्रतिनिधी) :नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फैजपूर शहरात मतदार यादीतील गंभीर त्रुटी समोर आली आहे. प्रभाग क्रमांक 10 मधील जवळपास 2,000 मतदारांची नावे चुकीने प्रभाग क्रमांक 1 मध्ये समाविष्ट करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या प्रकरणाबाबत स्थानिक नागरिक शेख कुर्बान शेख करीम यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, कळमोदा रोड, तडवी वाडा, इस्लामपुरा, यावल रोड दर्गा परिसर आणि आराधना कॉलनी (जुना आमोदा रोड) हे सर्व भाग प्रत्यक्षात प्रभाग क्रमांक 10 मध्ये मोडतात. मात्र, मतदार यादीत या भागांचा समावेश चुकीने प्रभाग क्रमांक 1 मध्ये करण्यात आला आहे.

या चुकीमुळे प्रभाग क्र. 10 मध्ये फक्त 1,339 मतदारांची नावे नोंद झाली असून प्रत्यक्ष संख्या यापेक्षा कितीतरी अधिक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. नागरिकांचा आरोप आहे की या गडबडीमुळे मतदारांचा मतदानाचा हक्क आणि प्रतिनिधित्वावर परिणाम होतोय तसेच संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शेख कुर्बान शेख करीम यांनी प्रशासनाकडे तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. तसेच “जर न्याय मिळाला नाही, तर या प्रकरणावर हायकोर्टात याचिका दाखल केली जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed