माजी आमदार साहेबराव पाटील यांची मागणी. निकषात नसल्याने वनशेतीचे पंचनामे रद्द करा..
आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर — अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाने निश्चित केलेल्या निकषात वनशेतीचा समावेश नसल्याने वनशेतीवरील पंचनामे रद्द करावेत, अशी मागणी माजी आमदार कृषिभूषण यांनी तहसीलदार पारोळा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पारोळा तालुक्यातील शेळावे मंडळात १६ आणि १७ ऑगस्ट रोजी अनुक्रमे ८६.३० मिमी व १२७.५० मिमी अतिवृष्टी झाली. यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासनाच्या निकषानुसार कोरडवाहू, बागायती व बहुवार्षिक फळपिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत.
या सोबतच शेळावे मंडळातील राजवड शिवारात माजी आमदार पाटील यांच्या सून सायली धिरेंद्र पाटील यांच्या विनाअनुदानित साग वनशेती व मुलगा धिरेंद्र पाटील यांच्या विनाअनुदानित महोगनी वनशेती या सुमारे १३.२४ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे देखील झाले. मात्र शासन निकषात वनशेती अथवा वृक्षलागवडीचा समावेश नसल्याने चुकीने मदत मिळू नये या औदार्याने पाटील यांनी स्वतः पंचनामे रद्द करण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आली आहे.

