अवघ्या चार तासांत सराईत चोरटा पोलीसांच्या जाळ्यात — चोरीची मोटरसायकल हस्तगत..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर — पोलिसांच्या वेगवान कारवाईत अवघ्या चार तासांत मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला पकडण्यात आले असून, चोरीची मोटरसायकल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२.०० ते १.३० वाजेदरम्यान जयपाल इंदरसिंग राजपूत, रा. गंणपूर ता. चोपडा हे आपल्या मित्रासह अमळनेर येथील न्यायालयात आले होते. त्यांनी आपली (क्रमांक MH 19 DP 4541) ही मोटरसायकल न्यायालयाच्या गेटजवळ पार्किंगमध्ये लावली होती. मात्र, अज्ञात चोरट्याने ती मोटरसायकल चोरून नेली. याबाबत अमळनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
या घटनेनंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान गायकवाड व गुन्हे अन्वेषण पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, पोलीस कॉन्स्टेबल विनोद संनदनशिव व उदय बोरसे यांनी तपास सुरू केला. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या चार तासांत आरोपीला चोरीच्या मोटरसायकलसह पकडले.
आरोपी धनंजय रवींद्र पाटील, रा. विद्यानगरी, देवपूर, धुळे हा कौटुंबिक प्रकरणात तारखेवर न्यायालयात आला होता. कामकाज संपल्यानंतर मास्टर कीच्या सहाय्याने त्याने मोटरसायकलचे लॉक उघडून ती चोरून नेली होती. या आरोपीने यापूर्वी धरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बुलेट मोटरसायकल चोरी केली होती. त्यावेळीही पोलिसांनी त्याला अटक करून वाहन जप्त केले होते.
आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपली आर्थिक मालमत्ता सुरक्षित ठेवावी, घरात रोख रक्कम वा दागिने ठेवू नयेत तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन पोलीस निरीक्षकांनी केले आहे.
ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या आदेशाने करण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार करीत आहेत.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 127000
22 Ct सोने 91.60% : ₹. 116300
18 Ct सोने 75.00% : ₹. 96500
शुद्ध चांदी 999%:₹. 1700/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
