भला मोठा ८ फूट अजगर बोरी नदीकाठावर पकडला — मांजरीच्या पिल्लाला गिळले, नंतर वनक्षेत्रात सोडला

0
New-Doc-10-09-2025-10.33.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर :तांबेपुरा परिसरात बोरी नदीकाठावर आज सकाळी एक भला मोठा अजगर साप सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सकाळी सुमारे ७ वाजता श्री. भूषण पाटील यांच्या शेतात सरपणाच्या काड्यांमधून मांजरीच्या पिल्लाचा आवाज येत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पाहणी केली असता एक विशाल सापाने पिलाला विळखा मारलेला दिसला.

घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र अविनाश परमार, अजित पिंजारी, निखील बोरसे आणि अक्षय उदेवाल हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी साप हा अजगर जातीचा असल्याचे ओळखले व काळजीपूर्वक त्याला पकडले. दुर्दैवाने, पकडण्यापूर्वीच अजगराने मांजरीचे पिल्लू गिळले होते.

सदर अजगराला तपासणीसाठी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रभाकर भामरे यांचेकडे नेण्यात आले. तपासणीत अजगराची लांबी अंदाजे ८ फूट आणि वजन सुमारे १४ किलो असल्याचे आढळले. अजगराच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा नसल्याने तो पूर्णतः निरोगी असून जंगलात सोडण्यास योग्य असल्याचे सांगण्यात आले.

यानंतर वनविभागाचे श्री. एस. बी. देशले (आर.एफ.ओ.), श्री. गुलाब पिंजारी (वनपाल) आणि श्री. दुर्गादास वानखेडे (वनरक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या राखीव क्षेत्रात त्या अजगराला सुरक्षितपणे सोडण्यात आले.

अजगराबाबत श्री. भामरे यांनी सांगितले की, मागील अतिवृष्टीमुळे हा साप बोरी नदीच्या पुराच्या प्रवाहात वाहून आला असावा. अजगराचे आयुष्य साधारण ३२ वर्षांचे असते आणि तो २ वर्षांपर्यंत अन्नाशिवाय जगू शकतो. ससा ते हरीणपर्यंतचे प्राणी तो सहज गिळकृत करू शकतो.

परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कुठेही साप दिसल्यास त्याला ठार मारू नये. तत्काळ सर्पमित्रांना संपर्क करून पकडण्याची व्यवस्था करावी. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक प्राणी महत्वाचा आहे. “साप वाचवा, निसर्ग वाचवा” असा संदेश देण्यात आला आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 126000

22 Ct सोने 91.60% : ₹. 115400

18 Ct सोने 75.00% : ₹. 95800

शुद्ध चांदी 999%:₹. 1590/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed