संत ज्ञानेश्वर विद्यालयात किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य समुपदेशन
24 प्राईम न्यूज 26 Sep 2025
अमळनेर : श्री संत ज्ञानेश्वर पाटील माध्यमिक विद्यालयात स्वस्त नारी सशक्त भारत अभियानांतर्गत इयत्ता आठवी ते दहावीतील किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी आरोग्यविषयक समुपदेशनाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी डॉक्टर श्रीमती अमिता श्रीवास्तव यांनी विद्यार्थिनींना त्वचेचे विकार, मासिक पाळीतील समस्या, व्यसनाधिनता, हिंसक प्रवृत्ती, वर्तणुकीतील बदल, आत्महत्येची प्रवृत्ती आदी विषयांवर मार्गदर्शन केले. किशोरवयीन आरोग्याविषयी असणारे गैरसमज दूर करण्याबरोबरच किशोरवयीन हेल्पलाईन क्रमांक 1800 233 2688 याचीही माहिती विद्यार्थिनींना देण्यात आली.
आरोग्याबाबत घ्यावयाची काळजी, योग्य सवयी व संतुलित आहाराचे महत्त्व याबाबतही डॉक्टर श्रीवास्तव यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शितल कोळी मॅडम यांनी केले तर डॉक्टर श्रीमतींचे स्वागत उज्वला नन्नवरे मॅडम यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. या वेळी विद्यालयातील सर्व महिला शिक्षिका उपस्थित होत्या.
