नंदुरबारमध्ये मोर्चाला हिंसक वळण. गाड्यांची तोडफोड, पोलिसांकडून सौम्य लाठीमार..
नंदुरबार/ प्रतिनिधि

नंदुरबार : आदिवासी समाजाच्या मूक मोर्चाला बुधवारी नंदुरबारमध्ये हिंसक वळण लागले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही उपद्रवींनी वाहनांची तोडफोड केल्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार आणि अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.
या गोंधळात पोलिस निरीक्षक, एक पोलीस कर्मचारी आणि एक सामाजिक कार्यकर्ता असे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
१७ सप्टेंबर रोजी दोन युवकांमध्ये झालेल्या हाणामारीत जय वळवी या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्याच्या हत्येच्या निषेधार्थ आदिवासी समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा शांततेत सुरू असताना शेवटच्या टप्प्यात काही उपद्रवींनी जिल्हाधिकारी कार्यालयात जबरदस्ती प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले.
यानंतर काही आंदोलक आक्रमक झाले आणि वाहनांची तोडफोड तसेच दगडफेक केली. परिस्थिती बिघडू नये म्हणून मृत युवकाचे नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोर्चेकऱ्यांना शांततेचे आवाहन केले.
सध्या नंदुरबार शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
