अमळनेर नगरपरिषदेचा स्वच्छता हि सेवा अभियानाचा शुभारंभ. ५.५ टन कचऱ्याची विल्हेवाट, शहरवासीयांना सक्रिय सहभागाचे आवाहन
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर :स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (MoHUA), भारत सरकार यांच्याकडून देशभरात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता हि सेवा अभियान २०२५ ला अमळनेर नगरपरिषदेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
आज १७ सप्टेंबर २०२५ रोजी नगर परिषद कार्यालय व आयुडीपी शॉपिंग कॉम्प्लेक्स, पु. साने गुरुजी पुतळा परिसर, शॉपिंग कॉम्प्लेक्स छत, बसस्थानक परिसर, बालेमिया परिसर मुख्य रस्ता, धुळे रस्ता, पिंपळे रस्ता, ढेकू रस्ता आदी ठिकाणी व्यापक स्वच्छता मोहीम राबवून तब्बल ५.५ टन कचरा हटविण्यात आला.
हा उपक्रम अमळनेर नगरपरिषदेचे प्रशासक व मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या वेळी स्वच्छता निरीक्षक किरण कंडारे, स्वच्छता निरीक्षक संतोष माणिक, शहर समन्वयक गणेश गढरी, मुकादम, सफाई कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.
१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान हे अभियान शहरभर राबविले जाणार असून, सर्व नागरिक, शासकीय-निमशासकीय संस्था, शाळा, सामाजिक संस्था, कार्यकर्ते, नगरसेवक, पत्रकार संघ यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.
