गलवाडे शिवारात मुरुमाची सर्रास लूट; प्रशासन व लोकप्रतिनिधींचे डोळेझाक..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर :- खाणपट्टा मंजूर नसताना अमळनेर शहरालगत गलवाडे शिवारातील साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाच्या मागील भागातून हजारो ब्रास मुरूमची अवैधरित्या लूट सुरू आहे. जेसीबीच्या सहाय्याने मुरुम उपसा करून डंपरद्वारे वाहतूक केली जात असून, स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी या लुटीकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप होत आहे.
यामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडत असून पर्यावरणालाही मोठा फटका बसला आहे. ग्राम महसूल अधिकारी, कोतवाल व पोलीस पाटील यांनी या मुरुम चोरीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.
अलीकडेच या भागातून मुरुम वाहून नेणारे काही डंपर पकडून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले होते. मात्र त्यानंतर कोणती कार्यवाही झाली, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
दरम्यान, १७ जुलै रोजी राज्य शासनाने काढलेल्या आदेशानुसार महसूल अधिकाऱ्यांनी वाळू व इतर गौण खनिजांच्या अवैध उत्खनन, वाहतूक व तस्करीविरोधात थेट फौजदारी गुन्हे दाखल करणे बंधनकारक आहे. तरीसुद्धा कारवाई टाळली जात असल्याने या अधिकाऱ्यांवरच कारवाईची टांगती तलवार आहे.
शासनाचा महसूल बुडवणाऱ्या या बेकायदेशीर उपसाला आळा घालून शासननिर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.
