ब्रह्माकुमारीज रक्तदान महाअभियान : नांदेडकर होणार जागतिक विक्रमाचे साक्षीदार
24 प्राईम न्यूज 23 Aug 2025
नांदेड :ब्रह्माकुमारीज संस्थेच्या माजी मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या १८ व्या पुण्यतिथी व विश्वबंधुत्व दिनाच्या निमित्ताने देशभर भव्य रक्तदान महाअभियान राबविण्यात येत आहे. या महाअभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ केंद्रीय आरोग्य मंत्री मा. जे. पी. नड्डा यांच्या हस्ते १७ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे झाला. या अंतर्गत भारत व नेपाळातील सहा हजारांहून अधिक सेवा केंद्रांवर एकाच वेळी रक्तदान शिबिरे होणार असून, एक लाख युनिट रक्तदान करण्याचा संकल्प आहे. या माध्यमातून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे.
नांदेडमध्ये २४ ऑगस्टला भव्य शिबिर
या अभूतपूर्व अभियानाचा भाग म्हणून २४ ऑगस्ट २०२५ रोजी ब्रह्माकुमारीज सदभावना भवन, वसंत नगर, नांदेड येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी मा. राहुल कर्डिले यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख उपस्थितीत नांदेड दक्षिणचे आमदार मा. आनंदराव बोडारकर, नांदेड उत्तरचे आमदार मा. बालाजीराव कल्याणकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर देशमुख यांचा समावेश असेल.
रक्तदानाचे सर्वश्रेष्ठ दान
सेवाकेंद्र संचालिका ब्रह्माकुमारी स्वाती बहनजी यांनी सांगितले की, “जागतिक इतिहासाचा हा सुवर्णक्षण नांदेडकर अनुभवणार आहेत. अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करून शहराचे नाव उज्ज्वल करावे.”
जिल्हाधिकारी मा. राहुल कर्डिले यांनी देखील “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून या विक्रमात सहभागी होणे म्हणजे एक अभिमानाची गोष्ट आहे” असे आवाहन केले.
रक्तदात्यांसाठी विशेष सुविधा
या शिबिरात सहभागी होणाऱ्या रक्तदात्यांना ब्लड बँकेकडून अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच पुढील दोन वर्षे रक्तदात्यास किंवा त्यांच्या नातेवाईकांना रक्ताची गरज भासल्यास ते उपलब्ध करून देण्याची सोय असेल. शिवाय ब्रह्माकुमारीज विद्यालयाकडून सर्टिफिकेट व गिफ्ट देण्यात येणार आहे.
