जळगावकरांसाठी सुखद वार्ता : नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचे भव्य स्वागत.
24 प्राईम न्यूज 11 Aug 2025

जळगाव – विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्राला वेगवान व आधुनिक रेल्वेसेवेने जोडणारा ऐतिहासिक क्षण रविवारी साकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवत नागपूर–पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला रवाना केले. या मार्गात भुसावळ व जळगाव या महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश असल्याने जळगावकरांसाठी पुण्याचा प्रवास आता अधिक जलद, आरामदायी व आधुनिक होणार आहे.
नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या या गाडीचे भुसावळ व जळगाव स्थानकांवर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. भुसावळ येथे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवला. जळगाव स्थानकावर खासदार उज्ज्वल निकम, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत गाडीचे स्वागत करण्यात आले. स्थानके फुलांच्या माळा व पताकांनी सजवण्यात आली होती.
या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी प्रवासी, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. वंदे भारत एक्स्प्रेसच्या नव्या सेवेमुळे धार्मिक पर्यटन, व्यापारी देवाणघेवाण, पर्यटन उद्योग आणि रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
