गोगादेव छडी मिरवणुकीत दोन गटात हाणामारी; चाकूहल्ल्यात तिघे जखमी, १९ जणांवर गुन्हा
आबिद शेख/अमळनेर
गोगादेव छडी मिरवणुकीदरम्यान दोन गटांच्या छड्या समोर आल्याने वाद निर्माण होऊन हाणामारी झाली. या चकमकीत चाकूहल्ला व काठीने मारहाण होऊन तिघे जखमी झाले. ही घटना ९ ऑगस्ट रोजी रात्री घडली.

मिरवणूक समोरासमोर आल्यावर एका गटाने शिवीगाळ व मारहाण सुरू केली. सनी राजू जाधव, विनोद टिल्लू जाधव, छोटू विनोद जाधव यांनी लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. नितेश विकास जाधव याने सुऱ्याने भगत सुनील चिरावंडे याच्या पोटात वार केला, तर विकास उर्फ बुद्धा टिल्लू जाधव याने राकेश कल्याणेच्या हातावर वार केला. तसेच पल्लू घारु, करण विनोद जाधव, आकाश जगन जेधे, राजा सुनील खरारे यांनी नरेश कालू कल्याणेच्या डोक्यावर काठीने मारहाण केली. इतर आरोपींनीही मिरवणुकीतील काही जणांना मारहाण व शिवीगाळ केली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जमाव पांगवला. वेळेवर हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला. जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना धुळे येथे हलवण्यात आले. शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. एकूण १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
