वक्फ बचाव समितीची जिल्हाभरात जनजागृती मोहीम सुरू. -वक्फ कायदा विरोधात आंदोलनाची तयारी; समितीने दिले समाजाला एकत्र येण्याचे आवाहन
24 प्राईम न्यूज 13 April 2025
जळगाव – भारत सरकारने वक्फ कायदा 1995 मध्ये हुकूमशाही पद्धतीने सुधारणा करून तो संपुष्टात आणत ‘उम्मीद 2025’ या नावाने नवीन कायदा लागू केला आहे. या कायद्याच्या विरोधात देशभरातून खासदार, सामाजिक कार्यकर्ते व धार्मिक संघटनांनी ई-मेल व निवेदनाच्या माध्यमातून विरोध दर्शवला असतानाही सरकारने तो कायदा लागू केला. याला विरोध करण्यासाठी वक्फ बचाव समितीची स्थापना करण्यात आली असून, जिल्हाभरात जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.
वक्फ बचाव समिती गठित
या कायद्याचे मुस्लिम समाज व संविधानविरोधी स्वरूप जनतेसमोर मांडण्यासाठी वक्फ बचाव समितीची स्थापना जळगाव शहरात 10 एप्रिल रोजी करण्यात आली. मुफ्ती खालिद यांच्या नेतृत्वात गठित या समितीत मुफ्ती अबूजर, मौलाना अख्तर नदवी, मुफ्ती रमिज, मुफ्ती रेहान, मौलाना वसीम पटेल, मौलाना एजाज, मौलाना शफीक पटेल, मौलाना कासिम नदवी, मौलाना उमेर, मौलाना रहीम पटेल, मौलाना शफीक रहेमानी तसेच अनेक धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे.
कॉर्नर मीटिंगद्वारे जनजागृती

शहरातील विविध भागात कॉर्नर मीटिंग घेऊन वक्फ कायदा 1995 व नवीन कायद्यातील तरतुदी, तसेच त्यातील संविधानविरोधी मुद्द्यांविषयी माहिती देण्यात येत आहे. भारताचे गृहमंत्री व अल्पसंख्यांक मंत्री जनतेची दिशाभूल करत असून, कायद्याच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. या उपक्रमात मौलाना उमेर, मौलाना कासिम नदवी, मौलाना तौसिफ शाह, मुस्तफिझ शकील, अहेसान असलम यांचा सक्रीय सहभाग आहे.
जिल्हाभर मोहीम विस्तारली
जिल्हाभरात मुफ्ती खालिद यांच्या नेतृत्वात फारुक शेख, आरिफ देशमुख, मजहर खान, अन्वर खान, अनिस शहा, मतीन पटेल, युसुफ खान, नजमुद्दीन शेख, अमजद पठाण हे कार्यरत आहेत. अडावद व चोपडा येथे सभा पार पडल्या असून भुसावळ, एरंडोल, यावल, अमळनेर येथे आगामी सभा आयोजित केल्या जात आहेत.
वक्फ बचावासाठी आंदोलनाची घोषणा
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या मार्गदर्शनाखाली 10 एप्रिल ते 7 जुलै दरम्यान लोकशाही मार्गाने विविध आंदोलन करण्यात येणार आहेत. यामध्ये निदर्शने, ठिय्या आंदोलन, साखळी उपोषण, धरणे आंदोलन, रस्ता रोको, रेल रोको व जेल भरो आंदोलन यांचा समावेश आहे.
“सर्व समाज बांधवांनी एकत्र यावे” – फारुक शेख
हा कायदा केवळ मुस्लिम समुदायाविरोधात नसून तो संविधान व लोकशाही मूल्यांविरोधात असून सर्व समाजाच्या एकतेवर घाला आहे, असे मत समितीने पत्रकाद्वारे मांडले आहे. फारुक शेख व मुफ्ती खालिद यांनी जिल्हाभरातील सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन या कायद्याविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन केले आहे.
