अमळनेर पोलीस स्टेशनतर्फे “सायबर साथी” उपक्रम राबवला; होमगार्ड जवानांसाठी सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – सायबर गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत असताना नागरिकांमध्ये जनजागृती होणे अत्यावश्यक बनले आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेर पोलीस स्टेशनतर्फे “सायबर साथी” या विशेष जनजागृती मोहिमेअंतर्गत होमगार्ड जवानांसाठी सायबर सुरक्षा प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विविध सायबर गुन्ह्यांबाबत सविस्तर माहिती दिली. ऑनलाईन बँकिंग फसवणूक, सोशल मीडियावरील गुन्हे, फिशिंग, OTP फसवणूक यांसारख्या प्रकारांचे उदाहरणांसह विवेचन करत त्यांनी अशा घटनांपासून संरक्षण कसे करावे, याविषयी मार्गदर्शन केले.
हा उपक्रम पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. विनायक कोते आणि परिविक्षाधीन पोलीस अधिकारी श्री. केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला. अनेक होमगार्ड जवानांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत सायबर सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळवली.
या उपक्रमाचा उद्देश म्हणजे नागरिकांपर्यंत सायबर सुरक्षेची माहिती पोहोचवणे आणि संभाव्य फसवणुकींपासून त्यांचे संरक्षण करणे हा होता. कार्यक्रमामुळे सहभागी जवानांमध्ये सायबर जागरूकता वाढल्याचे दिसून आले.
