अमळनेर मध्येआपत्ती व्यवस्थापनाचे धडे; अग्निशमन व बचावकार्याचे विद्यार्थ्यांसमोर प्रात्यक्षिक आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण दिनानिमित्त समाजकार्य महाविद्यालयात जनजागृती; पूरमदत कार्यकर्ते व अग्निशमन पथकाचा सन्मान.
अमळनेर /आबीद शेख

अमळनेर |आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण दिनानिमित्त मेरा युवा भारत, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे आपत्ती व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी झालेल्या या उपक्रमात अमळनेर अग्निशमन विभागाच्या पथकाने विद्यार्थ्यांना आग विझविण्याच्या विविध पद्धती, अग्निशामक यंत्रांचा योग्य वापर आणि आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या बचावकार्याची प्रात्यक्षिके सादर करून मार्गदर्शन केले.
अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनचालक फारुख शेख, फायरमन दिनेश बिन्हाडे आणि फायरमन आकाश संदानशिव यांनी आगीचे विविध प्रकार, आग लागल्यानंतर घ्यावयाची खबरदारी, आग नियंत्रणात आणण्याच्या पद्धती तसेच आपत्तीच्या काळात नागरिकांनी कशा प्रकारे सतर्क राहावे, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व समजून घेण्यास मदत झाली.

दरम्यान, अलीकडील पूरपरिस्थितीत मदतकार्य करून सामाजिक बांधिलकी जपणारे युवक जिगर शिंदे आणि दीपक पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी व त्यांच्या पथकाला शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. जगदीश सोनवणे होते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे, प्रा. डॉ. सागरराज चव्हाण, प्रा. डॉ. भरत खंडागळे, प्रा. डॉ. अस्मिता सरवैया, प्रा. डॉ. श्वेता वैद्य आणि प्रा. डॉ. आर. डी. ढगे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. मेरा युवा भारत, जळगावचे जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
मेरा भारत, अमळनेरचे तालुका समन्वयक तथा आपदा मित्र सागर कोळी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर प्रा. डॉ. अनिता खेडकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
आपत्तीच्या काळात योग्य निर्णय, तत्पर प्रतिसाद आणि सुरक्षित बचावकार्य यांचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविणे, तसेच आपत्तीपूर्व तयारी व आपत्तीनंतरच्या मदतकार्याबाबत जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

