अमळनेर नगरपरिषदेची प्लास्टिक बंदीविरोधात धडक मोहीम; १७५ किलो प्लास्टिक जप्त दोन व्यावसायिक आस्थापनांना १० हजारांचा दंड; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा.
अमळनेर आबीद शेख.
अमळनेर येथील प्रतिबंदिस्त प्लास्टिकचा वापर आणि विक्री करणाऱ्यांविरोधात अमळनेर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने १३ ऑक्टोबर रोजी विशेष तपासणी मोहीम राबवली. या कारवाईत एकूण १७५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन व्यावसायिक आस्थापनांना १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने प्लास्टिक बंदीच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. याअंतर्गत गुरुकृपा प्लास्टिक, कोमल हॉटेल, संजय प्लास्टिक, बाबा प्लास्टिक आणि अनिल एजन्सी येथे पथकाने तपासणी केली. तपासणीदरम्यान प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर आणि साठवणुकीबाबत पाहणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन आढळलेल्या दोन ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आली, तसेच मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जप्त करण्यात आले.

प्लास्टिकच्या अनियंत्रित वापरामुळे पर्यावरणाचे नुकसान होते. प्लास्टिक कचऱ्यामुळे नाले तुंबणे, अस्वच्छता निर्माण होणे आणि सार्वजनिक आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्लास्टिकचा वापर, साठवणूक आणि विक्री टाळावी, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.
शहरातील व्यापारी आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये प्लास्टिक बंदीच्या नियमांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी यापुढेही अशा तपासणी मोहिमा राबविण्यात येणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मख्याधिकारी गणेश कारबारी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, संतोष जाधव, योगेश पवार, वाहनचालक बालकृष्ण जाधव, जया सरदार, सतीश बिराडे, आनंद संदानशिव, युनूस शेख, गणेश गडरी, शहर समन्वयक तसेच आरोग्य विभागातील इतर कर्मचारी सहभागी झाले होते.

