धार-मारवड आणि कळमसरे-निम रस्त्यांच्या ३ कोटी ७६ लाखांच्या कामांचे भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश; ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था होणार अधिक सक्षम.
अमळनेर /आबिद शेख 
अमळनेर : अमळनेर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणाऱ्या बोळे-मोंढाळे-फाफोरे-अमळनेर-मारवड-निम-कपिलेश्वर (प्रजिमा-४९) या महत्त्वपूर्ण मार्गाच्या सुधारणा कामांना आता गती मिळाली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या सुधारणेच्या मागणीला अखेर यश आले असून, धार ते मारवड आणि कळमसरे ते निम या दोन रस्त्यांच्या एकूण ३ कोटी ७६ लाख रुपये खर्चाच्या कामांचे भूमिपूजन २७ नोव्हेंबर रोजी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.
या प्रकल्पांतर्गत धार ते मारवड रस्त्याच्या सुधारणेसाठी १ कोटी ८८ लाख रुपये, तर कळमसरे ते निम रस्त्यासाठी १ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी अपेक्षित आहे. यापूर्वी सुमारे १२ दिवसांपूर्वी अमळनेर ते धार या १ कोटी ८८ लाख रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला असून, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे या संपूर्ण रस्ता विकास प्रकल्पाला आता वेग मिळाला आहे.
अनेक वर्षांची मागणी अखेर मार्गी

धार, मारवड, कळमसरे, निम आणि परिसरातील गावांना जोडणारा हा मार्ग ग्रामीण भागाच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या रस्त्यावरून शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांची दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. तसेच निम व कपिलेश्वर येथील श्री अनिरुद्ध बापूंच्या तीर्थस्थळी जाणाऱ्या भाविकांचीही या मार्गावरून ये-जा असते. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना अनेक वर्षांपासून त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे रस्त्याचे दर्जेदार नूतनीकरण करण्याची मागणी सातत्याने होत होती. आता कामांना सुरुवात होत असल्याने परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
मारवड ते कळमसरे रस्त्याच्या कामाचीही मागणी
या संपूर्ण मार्गातील मारवड ते कळमसरे हा उर्वरित रस्ता सुधारण्यासाठी अंदाजे २ कोटी १२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या कामालाही लवकरात लवकर मंजुरी मिळवून प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ करावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी आमदार अनिल पाटील यांच्याकडे केली. उर्वरित काम पूर्ण झाल्यास संपूर्ण परिसरातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होऊन ग्रामीण विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
यांची होती उपस्थिती
भूमिपूजन प्रसंगी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवनियुक्त संचालिका जयश्री अनिल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य व्ही. आर. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तसेच धार, मारवड, कळमसरे व निम येथील आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सोसायटी संचालक आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांना मिळालेली गती ही परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक ठरत असून, उर्वरित रस्त्याचे कामही लवकर मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

