ग्रामीण भागातील चोरट्यांचा बंदोबस्त करा; पोलीस गस्त वाढविण्याची आ. अनिल पाटील यांची मागणी शेतीपंप, केबल व गुरेढोरे चोरीच्या घटनांवर चिंता; २४ तास हेल्पलाइन सुरू करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन.
अमळनेर /आबिद शेख 
अमळनेर : अमळनेर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले.

अमळनेर, मारवड आणि पारोळा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये शेतीपंप, विद्युत केबल, विजेच्या तारा, शेतीसाठी लागणारे साहित्य तसेच गुरेढोरे चोरीला जाण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. याशिवाय घरफोड्यांच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
आधीच नैसर्गिक संकटे आणि आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या शेतकऱ्यांना चोरीच्या घटनांमुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. शेतीपंप आणि विद्युत केबल चोरीला गेल्याने सिंचन व्यवस्थाही बाधित होत असून शेतीच्या कामांवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे पोलिसांनी या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे आमदार पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे.
चोरीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी अमळनेर, मारवड व पारोळा पोलीस ठाण्यांच्या ग्रामीण हद्दीत नियमित पोलीस गस्त वाढवावी, संशयास्पद व्यक्ती आणि हालचालींवर विशेष लक्ष ठेवावे, तसेच चोरीच्या घटना घडलेल्या गावांमध्ये विशेष तपास व शोधमोहीम राबवावी, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.
यासोबतच शेतकरी आणि ग्रामस्थांना आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांशी तातडीने संपर्क साधता यावा, यासाठी स्वतंत्र २४ तास हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे. चोरी झालेल्या ठिकाणांच्या परिसरातील मोबाईल टॉवरचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) व अन्य तांत्रिक माहिती कायदेशीर प्रक्रियेनुसार तपासून चोरट्यांचा शोध घ्यावा, असेही निवेदनात सुचविण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करणे ही पोलीस प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे चोरीच्या घटनांकडे केवळ गुन्हे म्हणून न पाहता शेतकरी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न म्हणून पाहावे. चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि ग्रामीण भागात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करावे, अशी आग्रही मागणी आमदार अनिल पाटील यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

