DL Social Foundationचा पर्यावरणपूरक उपक्रम; ५०० रोपांचे वाटप करून वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश रोपलागवडीसोबत संगोपनाचीही जबाबदारी; नागरिकांकडून शपथ व हमीपत्रे.
अमळनेर/आबीद शेख 
अमळनेर : पर्यावरणाचे संरक्षण आणि शहराचे हरित वैभव वाढविण्याच्या उद्देशाने DL Social Foundationतर्फे वृक्ष वाटप व वृक्षसंवर्धन अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत विविध ठिकाणी नागरिकांना ५०० रोपांचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, केवळ रोपे वाटून न थांबता त्यांची लागवड करणे, नियमित पाणी देणे आणि झाडांचे संगोपन करून त्यांना जगविण्याची जबाबदारी नागरिकांवर सोपविण्यात आली.
रोपांच्या संवर्धनासाठी हमीपत्रे
वृक्षारोपणाचे अनेक उपक्रम राबविले जातात; मात्र योग्य देखभालीअभावी अनेक रोपे नष्ट होतात. ही बाब लक्षात घेऊन DL Social Foundationने वृक्षलागवडीबरोबरच वृक्षांचे संवर्धन करण्यावर विशेष भर दिला आहे. रोपे स्वीकारणाऱ्या नागरिकांकडून त्यांची योग्य ठिकाणी लागवड करून नियमित देखभाल करण्याची शपथ घेण्यात आली. तसेच, रोपांचे संगोपन व संवर्धन करण्याबाबत हमीपत्रेही घेण्यात आली. या उपक्रमामुळे वृक्षसंवर्धनाची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडण्यास मदत होणार आहे.
‘एक कुटुंब – एक झाड’चा संदेश

‘एक रोप आजचे – हिरवे भविष्य उद्याचे!’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या अभियानाद्वारे नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘एक कुटुंब – एक झाड, हिरवे अमळनेर – सुंदर अमळनेर!’ हा संदेश देत प्रत्येक कुटुंबाने किमान एका झाडाची जबाबदारी स्वीकारावी आणि पर्यावरण रक्षणाच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे परिश्रम
या अभियानाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे संचालक डॉ. समाधान मैराळे, संचालिका सौ. भावना मैराळे, प्रकल्प समन्वयक महेंद्र ढमाळ, किरण निकुंभ, महेश संदानशिव आणि उत्कर्ष भदाणे यांनी परिश्रम घेतले.
पर्यावरण संवर्धनाची ही चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, कुटुंबे तसेच विविध सामाजिक संस्थांनी वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन DL Social Foundationतर्फे करण्यात आले.
DL Social Foundation, अमळनेर, जि. जळगाव
संपर्क : ७७९६११२८९४
ई-मेल : dlsocialfoundation@gmail.com

